जि.प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ७.९७ लाखांची रोकड; लॉकरमध्ये साडेतीन कोटींचे सोने
जळगाव समाचार | ४ नोव्हेंबर २०२६
अवघ्या १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या मालमत्तेचा मोठा तपशील समोर आला आहे. त्यांच्या निवासस्थानाची आणि बँकेतील लॉकरची झडती घेतली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यामध्ये लाखोंची रोकड, दोन घरे, साडेतीन कोटींहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे. दहा हजारांच्या लाचप्रकरणातून कोट्यवधींची मालमत्ता समोर आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सतीश मन्सुलाल शिसोदे (५५, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, आदर्शनगर, जळगाव) हे जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दोन नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहकारी अभियंत्यासह १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पाच नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता ७ लाख ९७ हजार ९२० रुपये रोख आढळले. आदर्शनगर परिसरातील ४५ लाख आणि ६५ लाख रुपये किमतीची दोन घरे, तसेच फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व इतर वस्तूंची २४ लाख ३९ रुपयांची किंमत मिळून घरझडतीत एकूण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांचा मुद्देमाल आढळला.
बँक लॉकरमध्ये साडेतीन कोटींचे सोने
शिसोदे यांच्या जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मालमत्तेचा आणखी मोठा तपशील समोर आला. लॉकरमध्ये २ हजार ५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे, पट्ट्या, चेन, पेंडल, लॉकेट आणि बांगड्या आढळल्या. या सोन्याची किंमत ३ कोटी ५१ लाख ८९ हजार १५३ रुपये आहे. याशिवाय ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व दागिने मिळून आले असून, त्यांची किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये आहे. तसेच १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही आढळले असून, त्यांची किंमत ३ लाख ५५ हजार २८६ रुपये आहे. बँक लॉकरमधील या सर्व दागिन्यांची एकत्रित किंमत ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये इतकी आहे.
मालमत्तेच्या स्रोताकडे लक्ष
घरझडती आणि बँक लॉकरमधील मुद्देमालाची एकत्रित किंमत ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात समोर आले आहे. केवळ दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणातील कारवाईत एवढ्या मोठ्या मालमत्तेचा तपशील उघड झाल्याने या संपत्तीचे स्रोत काय आहेत, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालमत्तेच्या स्रोताबाबत पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लॉकर तपासणी पथकात पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, किशोर महाजन, संगिता पवार, राकेश दुसाने आणि सचिन चाटे यांचा समावेश होता. तर घरझडती पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सुनील वानखेडे आणि मनोज पाटील यांनी सहभाग घेतला.

![]()







