जळगाव समाचार | २६ ऑक्टोबर २०२६
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (दि. २६) ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाहणी करून विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला. यावेळी कचरा संकलनासाठी येणाऱ्या वाहनांची अनियमितता, गटारींची अस्वच्छता, बंद पथदिवे आणि धोकादायक विद्युत केबल्सचा प्रश्न समोर आला. कचरा संकलन नियमित करण्यासह गटारींची तातडीने साफसफाई, बंद पथदिव्यांची दुरुस्ती, एसएमआयटी महाविद्यालयाजवळील विद्युत खांबाचे स्थलांतर आणि मुक्ताईनगर परिसरातील लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित विभागांना दिल्या.
प्रभागातील ऑक्सिजन पार्क परिसरात गांजा व मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांविषयी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महापौरांनी पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कारवाईच्या सूचना दिल्या. पार्कमध्ये पथदिवे बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेच्या आरोग्य मंदिराला भेट दिल्यानंतर काही आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले. तसेच दुकानांमध्ये कचरा संकलनासाठी डस्टबिनची उपलब्धता तपासण्यात आली. ऑक्सिजन पार्कजवळ सुरू असलेल्या भुयारी गटाराच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. गुजरात पेट्रोल पंपासमोरील पुलाखाली राहणाऱ्या बेघर नागरिकांना महापालिकेच्या निवारा केंद्रात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, पुलाजवळील बिअर बार आणि रुग्णालयासमोर ग्राहकांकडून सर्व्हिस रोडवर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीसह नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित चालकांना जाब विचारत पार्किंगची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयासमोर वाहनांच्या नियोजनासाठी वॉचमन नेमण्याची गरजही अधोरेखित झाली. बार चालकांनी देशी दारू दुकानाच्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले. या पाहणीवेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जयश्री राहुल पाटील, प्रतिभा गजानन देशमुख, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे विशाल सुर्वे आणि संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

![]()







