‘प्रहार’ चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव, वामिका गब्बी आज जळगावात

 

जळगाव समाचार | ११ ऑक्टोबर २०२६

जळगाव : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम हे आज, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी जळगावकर रसिकांच्या भेटीला येणार आहेत. या विशेष कार्यक्रमामुळे जळगावातील चित्रपटप्रेमींना चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

‘प्रहार’ हा चित्रपट खासदार उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर, त्यांच्या कार्यावर आणि न्यायव्यवस्थेतील योगदानावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमामुळे जळगावकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमांतर्गत आज सायंकाळी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून चित्रपटाच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्याशी चित्रपटाविषयी संवाद साधण्याची संधीही यावेळी जळगावकर रसिकांना मिळणार आहे. तसेच खासदार उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’च्या वतीने करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे या समितीचे अध्यक्ष आहेत. नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ. रेखा महाजन, डॉ. राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, अ‍ॅड. भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतिक्षा सोनवणे, विराज कावडिया आणि हर्षल पाटील हे समितीचे प्रमुख सदस्य आहेत.

जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here