कान्ह ललित कला केंद्रात आजपासून स्पीक मॅके ऑटम कन्व्हेन्शनचा प्रारंभ


जळगाव समाचार | १ ऑक्टोबर २०२६

केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रातर्फे स्पीक मॅकेच्या (SPIC MACAY) आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आज, १ ऑक्टोबरपासून करण्यात आले आहे. मनभावन इमारतीतील महाकवी कालिदास नाट्यगृहात या चार दिवसीय Spic Macay Autumn Convention 2026 चे आयोजन करण्यात आले असून, १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान विविध भारतीय शास्त्रीय कला प्रकारांचे सादरीकरण आणि कार्यशाळा होणार आहेत. खानदेशात स्पीक मॅकेसोबत अशा प्रकारचे संमेलन आयोजित करण्याचा मान प्रथमच केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्राला मिळाला आहे.

संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री सतारवादक उस्ताद शाहीद परवेज यांच्या उपस्थितीत होणार असून, जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, केसीई सोसायटीचे सदस्य भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, शैक्षणिक संचालक मृणालिनी फडणवीस, स्पीक मॅके संमेलन समन्वयक सिम्पी सिंग आणि कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर उस्ताद शाहीद परवेज यांचे सतारवादन होणार आहे. यापूर्वी कान्ह ललित कला केंद्राच्या सप्तकलांवर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

संमेलनात १३ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत विविध कलाप्रकारांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळांमध्ये विविध कला क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत नामांकित कलावंतांचे सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमांसाठी कान्ह ललित कला केंद्रातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या कालिदास सभागृहाचा वापर करण्यात येणार आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विविध समित्यांमध्ये सुमारे १०० जण कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, पुणे, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यांसह गुजरातमधील नवसारी व बडोदा, मध्य प्रदेशातील इंदूर व बऱ्हाणपूर तसेच कर्नाटकातील विद्यार्थ्यांचा या संमेलनात सहभाग राहणार आहे. शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४०० विद्यार्थी संमेलनासाठी उपस्थित राहणार असून, त्यामध्ये १७० मुली आणि २३० मुलांचा समावेश आहे. सहभागी विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असून, विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेसाठी २५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संमेलनातील विविध कार्यशाळांच्या दालनांना भारतीय कला क्षेत्रातील नामवंत कलावंतांच्या नावांनी ओळख देण्यात आली आहे. नृत्य दालनाला पंडित बिरजू महाराज, संगीत दालनाला पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे, तर तबला दालनाला उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव देण्यात आले आहे. चित्रकला दालनाला चाळीसगाव तालुक्यातील कलावंत के. के. मूस यांच्या स्मरणार्थ ‘के. के. मूस प्रेरणा कलादालन’ असे नाव देण्यात आले आहे. केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आणि स्पीक मॅकेचे किरण शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here