जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२६
जळगाव शहरातील ३९ वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून पद्मालय परिसरातील जंगलात दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता अरुण सुतार असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (२९, रा. रेणुका नगर, रामेश्वर कॉलनी) याला अटक केली आहे. जुन्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
८ सप्टेंबर रोजी सकाळी कविता यांनी मुलासाठी डबा तयार केला होता. त्यानंतर मुलगा घराबाहेरून परतल्यानंतर त्या घरात दिसून आल्या नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद असल्याने कुटुंबीयांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, काहीच माहिती न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांत दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनसह तांत्रिक तपासाला सुरुवात केली. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी एरंडोल पोलिसांच्या हद्दीतील पद्मालयच्या घनदाट जंगलात कविता सुतार यांचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले.
तांत्रिक तपासातून मिळालेल्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी नरेश सोनवणे याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले. चौकशीत जुन्या प्रेमसंबंधातील वादातून कविताचे अपहरण करून पद्मालयच्या जंगलात नेले आणि तेथे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सपोउपनि विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, पोकॉ विशाल कोळी, किरण पाटील आणि गणेश ठाकरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
![]()






