जळगाव समाचार | १७ जुलै २०२६
खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे व कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध व्हावीत तसेच कृषी निविष्ठांच्या विक्रीत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने कृषी विभागाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत विविध प्रकारच्या अनियमितता आढळून आल्याने जिल्ह्यातील ५८ कृषी सेवा केंद्रांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये नऊ परवानाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून २३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच २६ परवानाधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांनी जिल्ह्यातील खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांच्या दुकानांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी दैनंदिन विक्री नोंदी अद्ययावत नसल्याचे, खते व बियाण्यांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे, शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने विक्री केल्याचे तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन व साठा नोंदींमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणांमध्ये संबंधित परवानाधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सुनावणी घेऊन तपासणी अहवाल, उपलब्ध पुरावे आणि संबंधितांनी सादर केलेल्या स्पष्टीकरणाची छाननी करण्यात आली. दोष सिद्ध झालेल्या प्रकरणांमध्ये कृषी विभागाने नियमानुसार अंतिम कारवाई करत परवाने रद्द, निलंबित किंवा ताकीद देण्याचा निर्णय घेतला. जिल्हाभरातील कारवाईत चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २० कृषी सेवा केंद्रांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, कृषी निविष्ठांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि शेतकऱ्यांना योग्य दरात दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी अशा तपासण्या पुढेही नियमित सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत शेतकऱ्यांनी खते, बियाणे किंवा कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी, दरपत्रकाची खात्री करावी आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

![]()





