जळगाव समाचार | १५ जुलै २०२६
यावल तालुक्यातील किनगाव शिवारात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विहिरीची पूजा करण्याच्या बहाण्याने अंध महिला आणि तिच्या साडेतीन वर्षीय अंध मुलाला शेतातील विहिरीजवळ नेऊन पती व सासूने विहिरीत ढकलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत साडेतीन वर्षीय कृष्णा स्वप्निल पाटील याचा मृत्यू झाला असून, त्याची आई सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७, रा. किनगाव, ता. यावल) या बचावल्या आहेत. या प्रकरणी यावल पोलिसांनी पती स्वप्निल भागवत पाटील (वय ३४) आणि सासू आशाबाई भागवत पाटील (वय ६०) या दोघांना अटक केली आहे.
सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यावल पोलिसांनी सखोल तपास करत घटनामागील कटाचा पर्दाफाश केला. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्वप्निल पाटील हा पूर्णपणे अंध असून, त्याची पत्नी सरस्वती या सुमारे ७० टक्के दृष्टिहीन आहेत. सरस्वती गर्भवती असताना सोनोग्राफी अहवालानंतर होणारे मूलही अंध जन्माला येण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर पतीने गर्भपात करण्यासाठी पत्नीवर दबाव आणला होता. मात्र, आईच्या ममतेपोटी सरस्वती यांनी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. याच कारणावरून गेल्या साडेतीन वर्षांपासून घरात सातत्याने वाद सुरू होते.
या वादातूनच विहिरीची पूजा करण्याचे कारण सांगून सरस्वती आणि कृष्णा यांना शेतात नेण्यात आले. तेथे दोघांना विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत कृष्णाचा मृत्यू झाला, तर सरस्वती या सुदैवाने बचावल्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पती स्वप्निल भागवत पाटील आणि सासू आशाबाई भागवत पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या अमानुष घटनेमुळे यावल तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

![]()





