जळगाव समाचार | १३ जुलै २०२६
जळगाव समाचारने अयोध्यानगर परिसरातील अयोध्या प्रॉव्हिजन ते सिद्धी मेडिकलदरम्यान बसवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या फायबर स्पीडब्रेकरांचा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर संबंधित स्पीडब्रेकर हटविण्यात आले आहेत. शहरातून MIDC कडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर आणि शाळांच्या परिसरात बसविण्यात आलेले हे स्पीडब्रेकर काही दिवसांतच उखडू लागल्याने त्यांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर हा मुद्दा जळगाव समाचारने उचलून धरला आणि त्यानंतर महापालिकेला हे स्पीडब्रेकर हटवावे लागले.
मात्र, स्पीडब्रेकर हटवून प्रकरण संपत नाही. हे काम मंजूर कोणी केले? दर्जा तपासला कोणी? निकृष्ट काम स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित ठेकेदारावर कोणती कारवाई होणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, हे काम जनतेच्या कराच्या पैशातून झाले होते. जर ते इतके निकृष्ट होते की काही दिवसांतच ते काढून टाकावे लागले, तर त्या कामावर खर्च झालेला लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी नेमका कुठे गेला? संबंधित ठेकेदाराकडून तो खर्च वसूल केला जाणार का, की जनतेचा पैसा कायमचा वाया गेला, याचे उत्तर महापालिकेने नागरिकांना देणे आवश्यक आहे.
या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे प्रदीप रोटे, हर्षल मावळे, माजी उपमहापौर सुनील खडके, वंदना इंगळे, रंजना वानखेडे आणि वीरेन खडके या सहा नगरसेवकांनीही या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. विकासकामांचा दर्जा, सार्वजनिक निधीचा वापर आणि कामांवरील देखरेख ही लोकप्रतिनिधींचीही जबाबदारी आहे. निकृष्ट काम हटविणे हा उपाय असू शकतो; मात्र निकृष्ट काम करणाऱ्यांना जबाबदार धरणे हीच खरी प्रशासनाची परीक्षा आहे.

![]()





