अमरावतीत वाद चिघळला; काँग्रेसचे खासदार आमदारांसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल…

 

अमरावती, जळगाव समाचार डेस्क;

अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (MP Balvant Wankhade) आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur)यांच्यासह १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माजी खासदारांकडून ताबा सोडण्यास दिरंगाई…
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या या कार्यालयाचा वापर माजी खासदार नवनीत राणा करत होत्या. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान या कार्यालयाचा ताब्याबाबत मागणी बळवंत वानखेडे यांनी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाच्या दिरंगाई आणि वेळखाऊ पणाला कंटाळून शनिवारी दुपारी खासदार वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर हे काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांनी कुलूप तोडून जबरदस्तीने खासदार कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि यशोमती ठाकूर यांच्यात चांगलाच वाद झाला. नवीन खासदाराचा सन्मान केला जात नाही. हे सर्व खपवून घेतले जाणार नाही. वाटल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही आज कार्यालयाचा ताबा घेणारच, असे सांगून यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने खासदार कक्षाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आता खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या १०-१५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या जनसंपर्क कार्यालयासमोर बॅरिकेट्स लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या जनसंपर्क कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा सील ठोकण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here