जळगाव समाचार | ८ जुलै २०२६
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखेतर्फे व. वा. वाचनालयाच्या रामनारायण सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे, याच सभागृहात गायकवाड यांनी एका दिवसात एकाच बालनाट्याचे दहा प्रयोग करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला होता.
या शोकसभेला त्यांच्या सहचरिणी अंजली धारु, कन्या शर्वरी धारु आणि संपदा जोशी विशेष उपस्थित होत्या. अंजली धारु यांनी मनोगतातून ज्ञानेश्वर गायकवाड यांचे जळगावशी असलेले अतूट नाते भावूक शब्दांत मांडले.
यावेळी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, ज्येष्ठ रंगकर्मी ओमप्रकाश शर्मा, चिंतामण पाटील, प्रतिमा धर्माधिकारी-याज्ञिक, राजेंद्र देशमुख, शंभू पाटील, पवन खंबायत, हर्षल पाटील तसेच नाशिकचे रंगकर्मी संदीप पाचंगे यांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील-शुक्ल यांनी केले. शोकसभेला बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी, सभासद, कलावंत, नाट्यरसिक आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

![]()




