अमळनेरजवळ खदानीत बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

 

जळगाव समाचार | ७ जुलै २०२६

अमळनेर-चोपडा मार्गावरील उड्डाण पुलाजवळ पाण्याने भरलेल्या खदानीतील खोल खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे अमळनेर शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) हे तिघे मित्र पोहण्यासाठी उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खदानीच्या खड्ड्याकडे गेले होते. पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. देवळी येथील दीपक मोरे यांनी धाडसाने पाण्यात उडी मारून तिघांनाही बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी, पोलीस कर्मचारी गणेश पाटील तसेच देवळी व परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी परिसरावर शोककळा पसरली असून नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. पावसाळ्यात खदानी, पाण्याने भरलेले खड्डे, तलाव आणि इतर धोकादायक जलसाठ्यांमध्ये पोहण्यासाठी जाणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासन व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here