जळगाव समाचार | ६ जून २०२६
भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १६ सदस्यीय संघाची घोषणा केली असून, संघाच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि सचिव देवजित सैकिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. भारताचा संघ प्रथम मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून, त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर टी-२० मालिका खेळणार आहे.
या दोन्ही टी-२० मालिकांसाठी एकाच १६ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. संघाचे विद्यमान टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांना नेतृत्वातून बाजूला करण्यात आले असून, त्यांच्या जागी मुंबईचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच युवा फलंदाज तिलक वर्मा याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव यांचा या दोन्ही मालिकांसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.
निवड समितीने आगामी मालिकांसाठी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याला प्रथमच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही नव्या चेहऱ्यांनाही संघात स्थान मिळाले असून, भविष्यातील संघबांधणीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकांसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय संघ –
कर्णधार श्रेयस अय्यर, उपकर्णधार तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि वैभव सूर्यवंशी
![]()






