पत्नीसमोर अपमानाचा राग; धुळ्यात मुलाकडून आई-वडिलांची मुसळाने निर्घृण हत्या

 

जळगाव समाचार | १६ मे २०२६

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गुरुवारी (दि. १५) दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याच्या रागातून मुलानेच आई-वडिलांच्या डोक्यात मुसळाने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना महावीर सोसायटी परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी चंदन गंगा महतो याला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेत गंगा झिरीलाल महतो आणि रनजुदेवी गंगा महतो या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, महतो कुटुंबातील एका मुलीचा विवाह नुकताच पार पडला होता. विवाह समारंभ आटोपल्यानंतर आई-वडील गुरुवारीच घरी परतले होते. त्यानंतर घरात काही कारणावरून वाद झाला. पत्नीसमोर आई-वडिलांनी अपमानास्पद शब्द वापरल्याचा राग आरोपी चंदन महतो याच्या मनात होता. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात त्याने घरातील मुसळ उचलून आई-वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचे सांगितले जात आहे.

अचानक झालेल्या हल्ल्यात गंगा महतो आणि रनजुदेवी महतो गंभीर जखमी झाले. डोक्यावर जबर मार लागल्याने दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. घरातून आरडाओरडा ऐकून शेजारी आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. घरातील वादाचे नेमके कारण, घटनेपूर्वीची परिस्थिती आणि इतर बाबींची चौकशी पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, काही तासांपूर्वीच कुटुंबात लग्नाचा आनंदोत्सव असताना अचानक घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे शिरपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून सामाजिक माध्यमांवरही नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here