जळगाव समाचार | १६ मे २०२६
जळगाव शहरात प्रेमप्रकरणातून नैराश्य आलेल्या १९ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गणेश सोनवणे (रा. नांद्रा, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सोनवणे याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ४ मे रोजी घरातून निघून गेले होते. शुक्रवारी ते जळगाव रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांशी फोनवर संपर्क साधून आपली माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुणीचा भाऊ रेल्वे स्थानकावर पोहोचला आणि तिला सोबत घेऊन गेल्याचे समोर आले आहे.
प्रेयसीपासून विभक्त झाल्यानंतर गणेश मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. त्याने आत्महत्येपूर्वी आपल्या आईला फोन करून “आई, माझ्याकडून मोठी चूक झाली… हा माझा शेवटचा फोन आहे,” असे सांगितल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येनंतरही गणेशचा मोबाईल जवळपास २३ मिनिटे सुरू होता. रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा फोनच्या दुसऱ्या बाजूला आईचा आक्रोश ऐकू येत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गणेशच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणीच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवीगाळ करून कुटुंबाला संपवण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने गणेश दबावाखाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती.
गणेशचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आल्यानंतर आई-वडील, बहिणी व नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा ठरला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येपूर्वी झालेल्या कॉल रेकॉर्डिंगची तपासात महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी गणेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर संबंधित तरुणीसोबत रेल्वे प्रवासातील काही छायाचित्रे शेअर केली होती. त्या फोटोसोबत त्याने “My Wife My Jaan” असा उल्लेख केला होता. मात्र, काही तासांतच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

![]()




