जळगाव समाचार डेस्क;
दोन दिवसांपूर्वी शहरातून चेंडू खेळण्याच्या नादात नाल्यात वाहून घेलेल्या त्या 6 वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला आहे. मित्रांसोबत खेळत असताना हि घटना शहरातील खंडेरावनगर-हरिविठ्ठलनगर भागात घडली होती. अखेर अथक प्रयत्नानंतर रविवारी दुपारी त्या दुर्दैवी बालकाचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गावरील पोदार शाळेजवळील नाल्यात सापडला. या बातमीने परिवारासह परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मयत सचिन व त्याची बहिण हे लिंबू तोडायला गेले असता तो आजूबाजूच्या मुलांसोबत खेळू लागला होता. यावेळी चेंडू बाजूला असलेल्या नाल्यात पडला, तो चेंडू घेण्यास उतरला त्याचवेळी पावसामुळे नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढून तो त्यात वाहून गेला होता. दि. 6 रोजी शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हि घटना घडली होती. दरम्यान यावेळी त्याची बहीण तसेच व खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरड देखील केली. त्यामुळे परिसरातील नागरिक व त्याच्या आई-वडिलांनी सचिनला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेच सापडला नाही. रविवारी दिवस उजाडल्यावर अग्निशमन दलासह पोलिसांकडून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर जळगाव-धुळे महामार्गालगतच्या पोदार शाळेजवळ नाल्याच्या गाळात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह पाहताच सचिनच्या आई वडिलांनी टाहो फोडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.