जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५
भुसावळ तालुक्यातील खडका येथील अमोल आणि मनिषा धाडे यांचा तीन वर्षांचा मुलगा हर्षल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे.
हर्षलला चार दिवसांपूर्वी जळगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पायाला प्लास्टर लावताना त्याला इंजेक्शन आणि भूल देण्यात आली होती. त्यानंतर तो शुद्धीवर आला नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे मेंदूशी संबंधित कारण असल्याचे सांगून त्याला आणखी एका दवाखान्यात पाठवण्यात आले. मात्र २० एप्रिल रोजी सायंकाळी त्याला मृत घोषित करण्यात आले.
पालकांनी सांगितले की, उपचारासाठी व्याजाने पैसे उभे करून आम्ही मुलाला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी जबाबदारीने उपचार करत असल्याचे सांगितले होते. मात्र मुलाची प्रकृती अधिकच बिघडत गेली. शेवटी तिसऱ्या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
२१ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयाकडून दिलेल्या नोटीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र पालकांचा आरोप आहे की, त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली असतानाही पोलिसांनी “रात्रीचे वेळ” आणि “अधिकारी उपलब्ध नाहीत” अशी कारणे देत तक्रार स्वीकारली नाही.
या प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हर्षलच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.