भुसावळ तालुक्यातील साकरीत दोन शाळकरी मुलींची हत्या, परिसरात तणाव…

 

जळगाव समाचार | २७ जानेवारी २०२६

भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. ट्युशनसाठी घरातून निघालेल्या नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप व शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रोहन नरेंद्र चौधरी या तरुणाने दोघींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मृत विद्यार्थिनी लक्ष्मी अभय महाजन (वय १५, इयत्ता नववी, रा. गायत्री मंदिराजवळ, साक्री) व नयना विजय चौधरी (वय १५, इयत्ता नववी, रा. विठ्ठल मंदिराजवळ, साक्री) या जनता हायस्कूल, साक्री येथे शिक्षण घेत होत्या. सोमवारी सकाळी दोघी नेहमीप्रमाणे ट्युशनसाठी घरातून निघाल्या; मात्र त्या ट्युशनला पोहोचल्या नाहीत. बराच वेळ झाला तरी मुली न आल्याने ट्युशन शिक्षकांनी एका विद्यार्थ्यामार्फत त्यांच्या घरी याची माहिती दिली.

यानंतर पालक व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी सुमारे ७.४५ वाजता एका दुचाकीवर एक तरुण व दोन मुली ‘ट्रिपल सीट’ जाताना दिसून आले; मात्र अंतर जास्त असल्याने दुचाकीचा क्रमांक व तरुणाची ओळख स्पष्ट होऊ शकली नाही. दरम्यान सकाळी सुमारे ९ वाजता गावाजवळील सोपान महादेव फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोघींच्या शाळेच्या बॅगा आढळून आल्याने संशय अधिक बळावला.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाणे व बाजारपेठ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. गावातील मुकेश कोळी यांनी विहिरीत उतरून सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी महाजन हिचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर ‘बिलाई’च्या सहाय्याने शोध सुरू ठेवत पावणेदोनच्या सुमारास नयना चौधरी हिचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला.

पहिला मृतदेह बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती; मात्र आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली. जोपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढले जात नाहीत व आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. महिला व पुरुषांनी मृतदेहांसमोर ठिय्या मांडला. सकाळी नऊपासून दुपारी तीन वाजेपर्यंत परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

दरम्यान, रोहन नरेंद्र चौधरी याने “मी दोघींना विहिरीत ढकलले” अशी माहिती दिल्याचे समोर आले असून त्याआधारे तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काल २६ जानेवारीच्या कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले होते तसेच लेझीम पथक व वाद्यवृंदात सहभाग घेतला होता. आनंदात साजरा झालेला तो दिवस आणि आजची ही दुर्दैवी घटना यातील विरोधाभासाने संपूर्ण साक्री गावासह भुसावळ तालुका शोकसागरात बुडाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here