प्रतीक्षा संपली; उद्या लागणार बारावीचा निकाल…

जळगाव समाचार | ४ मे २०२५

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या सोमवार, ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल. तसेच, विषयनिहाय गुणांचा तपशील आणि त्याची मुद्रित प्रतही उपलब्ध होईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

या वर्षी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान पार पडली होती. यामध्ये १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना ६ मे ते २० मे या कालावधीत गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. हे अर्ज http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत करता येतील.
पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत आधी घेणे आवश्यक आहे. छायाप्रती मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल.

ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारायची आहे, त्यांना जुलै-ऑगस्ट २०२५ आणि फेब्रुवारी-मार्च २०२६ या दोनच संधी मिळणार आहेत.
पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया ७ मेपासून सुरू होणार असून, यासंबंधी परिपत्रक लवकरच प्रसिद्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here